Breaking News

दूरदृष्टीचे खरे राजे राजश्री शाहू महाराज

दूरदृष्टीचे खरे राजे राजश्री शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर च्या कागल येथे २६ जून १८७४ मध्ये झाला. महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार २ एप्रिल १८९४ ला प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई व आऊबाई या दोन कन्या झाल्या. त्यांनी प्रशासन-यंत्रणेची पुनर्ररचना करून बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरीही तरुण शाहूंनी धैर्याने त्यावर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.
*बहुजनांचे शिक्षण आणि आरक्षणाचे जनक*
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहू महाराजांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वस्तीगृहे स्थापन केली. शिवाय नाशिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वस्तीगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.
मागासलेल्या जातीत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहू महाराजांनी हे ओळखून २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू महाराज हे बहुजनांचे शिक्षण आणि आरक्षणासाठी कार्य करणारे भारतातील पहिले राज्यकर्ते ठरले.
-----------------------------------
अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यास पुढाकार

अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहू महाराजांनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास शाहू महाराजांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले होते. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यासारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले. जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणारा कायदा करून समाजातून अस्पृश्यता मिटविण्यासाठी पुढाकार घेतला.
----------------------------------
शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

शाहू महाराजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा भेट झाली तेव्हा बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास शाहू महाराजांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदेत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव ही केला होता. आपल्या देशाच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार व कृतींनी त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक व वैचारिक ऋणानुबंध निर्माण झाले होते. राजर्षी शाहू महाराजांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. दोघांमध्ये भावनिक नाते होतेच. त्याशिवाय दलितांविषयीची कणव व सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय यासाठीचा संघर्ष हा समान धागा होता. अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहू महाराजांनी अखेरपर्यंत संघर्ष केला.
-----------------------------------
विवाह आणि कौटुंबिक समस्यांबाबत ची जागरुकता

आंतरजातीय विवाह हा जातीभेदावर रामबाण उपाय वाटून शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही शाहू महाराजांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गातील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. यामुळे शाहू महाराजांच्या मनात विवाह आणि कौटुंबिक समस्यांबाबत किती जागरुकता होती हे दिसून येते.
शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. शाहू महाराजांनी अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले, तशातच महाराजांना मधुमेहाने ग्रासले होते. यातच ०६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. अशा या थोर समाजसेवकास पुण्यतिथी निमित्ताने माझे कोटी-कोटी प्रणाम .....!

लेखक -
धनवंतराव मस्के
मुख्याध्यापक तथा प्राचार्य 
पाटोदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाटोदा बेलखंडी, ता.बीड.
संपर्क - 90117 82893
________________________

एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़,
बीड.
संपर्क :- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत