नियम हवे दहशत नको;दंगल नियंत्रण पथक दहशत प्रसारण पथक होता कामा नये - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - सध्या कोरोना च्या उद्रेकामुळे राज्य शासनाने कडक लॉक डाऊन सह कर्फ्यू लावला असून यामधून दिलेल्या चार तासाच्या सवलतीमध्ये पोलीस प्रशासनाचे दंगल नियंत्रण पथकाने ज्या प्रमाणे फळ भाजी विक्रेत्यांना पहिल्याच दिवशी आपल्या दहशतीखाली ठेवले ते पाहता दिलेल्या सुट्टीच्या काळात नियमाचे पालन अवश्य हवे पण दहशत नको अशी मागणी जिल्हाधिकारी यांना आपले सरकार या वेबपोर्टल द्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २२ एप्रिल २०२१ च्या मध्यरात्रीपासून शासन-प्रशासनाकडून कडक लॉक डाऊन व संचारबंदी अर्थातच कर्फ्यू लागू करण्यात आला. मात्र यामधून दररोज सकाळी ०७.०० ते ११.०० अशी ४ तासांची सूट देण्यात आली आहे. या वेळेत हातावर पोट असणारे फळ-भाजी विक्रेते आपल्यासह आपल्या कुटुंबीयांच्या पोटाची खळगी भरण्याकरिता पहाटे ०४.०० वाजल्यापासून फळ व भाजीपाला आणण्याकरिता आडत मार्केट वरून भाजीपाला खरेदी करून तो विकण्यासाठी भाजी मंडई मध्ये येतात. जिथे दिवसभर बसून सुद्धा त्यांना अपेक्षित असलेले उत्पन्न मिळत नाही. तिथे या सूट दिलेल्या फक्त ४ तासांमध्ये उत्पन्न ते काय मिळणार ? परंतु शासन-प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे नागरिक म्हणून त्यांचे हि कर्तव्य आहे. यात दुमत नाही. मात्र खरी गोम इथेच दिसून येते. आज दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ११.१० मिनिटांनी दंगल नियंत्रण पथक आपल्या मोठ्या वाहनासह जवळपास अर्धा डझन शिपाई हातात लांबलांब दंडुके घेऊन सोबत व्हिडिओ कॅमेरामन असा लवाजमा घेत भाजी मंडई मध्ये दाखल झाले. या वेळी ते आपले कर्तव्य बजावत असले तरी त्यांची देहबोली अशी होती की, जसे काही भाजी मंडई मध्ये काही आतंकवादी लपलेले असून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता हे पथक आल्याचा भास यावेळी फळ भाजीविक्रेत्यांसह ग्राहकांनाही झाला. यावेळी मी ही तिथे ग्राहक म्हणून उपस्थित होतो. शासन-प्रशासनाने तयार केलेले नियम सर्वांनी पाळायला हवे हे नक्की. परंतु त्यात अशी दहशत असता कामा नये तर त्याच्यात सुसूत्रता असावी. आणि नेमकी याचीच कमतरता दिसून आली. यामुळे नियमाप्रमाणे दिलेल्या वेळेपेक्षा अवघे दहा मिनिटं अधिक झाल्याने दंगल नियंत्रण पथकाच्या अविर्भावामुळे फळ-भाजी विक्रेत्यांना स्वतः सह पैसे मोजून विक्रीसाठी आणलेल्या फळ भाज्यांना वाचवत आपले टोपले, डालगे, पोते, गठुडे आदी उचलून अक्षरशः पळावे लागले. हे चित्र पाहून शासन-प्रशासन आणि पोलिस कोरोना पासून जनतेला वाचविण्यासाठी हे सर्व करीत आहे की, त्यांच्यावर दहशत बसविण्याकरीता हा सर्व खटाटोप सुरू केलायं ? हा प्रश्न सहजच मनात येऊन गेला. अशाप्रकारे वेळ संपल्यावर ऐनवेळी येऊन दहशत निर्माण करण्याऐवजी पोलीस प्रशासन वेळ संपण्याच्या पंधरा मिनिटे अगोदर रस्त्यावर आपला लवाजमा घेऊन येऊ शकत नाही का ? वेळेआधी येऊन ध्वनिक्षेपक लावलेल्या पोलीस वाहनातून वेळ संपत आल्याचे आवाहन करू शकत नाही का ? जसे सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे, मुस्लिम बांधव रोजा ठेवण्यासाठी दररोज पहाटे उठून सहरी करतात. यावेळी जवळपास प्रत्येक मशिदी मधून ध्वनिक्षेपकावरून मस्जिद चे मौज्ज़न सहरी ची वेळ संपायला किती मिनिटे बाकी राहिले याची नियमितपणे आठवण करून देतात. यामुळे सहरी ची वेळ संपन्या अगोदर सर्व रोजेदार मुस्लिम बांधव सहरी करून मोकळे होतात. असे नियोजन मोठा लवाजमा आणि सर्व सोयी-सुविधा असताना पोलीस प्रशासन करू शकत नाही का ? शासन-प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा या फक्त त्या-त्या खात्यांसाठी किंवा विभागासाठी नसून त्याचा उपयोग जनतेसाठी ही व्हावा याकरिता आहेत. परंतु कर्फ्यू च्या अंमलबजावणीकरिता फक्त हातात दंडुके घेऊन पोलीस प्रशासन आणि त्यांचे शिपाई जनतेवर हल्लाबोल करत असेल तर मग या सोयी-सुविधांचा उपयोग काय ? याकडे शासन-प्रशासनानेही लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पोलिस आणि त्यांचे दंगल नियंत्रण पथक हे जनतेसाठी दहशत प्रसारण पथक होऊन जाईल हे नक्की. तेव्हा असे होऊ नये याकरिता कर्फ्यू काळात देण्यात आलेल्या सवलतीच्या वेळी पोलिसांकडून जनतेवर उगारण्यासाठी दंडुकेशाही चा वापर न करता नियमांच्या अंमलबजावणी साठी सुसूत्रता आणण्याचे कार्य चांगले प्रशासन म्हणून जनतेला शासन-प्रशासनाकडून अपेक्षित आहे. असे मत जिल्हाधिकारी यांना आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे पाठविलेल्या निवेदनातून व्यक्त केले आहे.
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़, बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा