उस्मान खान शाहिस्ता खान यांचा गौरवमय सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात साजरा शिक्षण क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी
उस्मान खान शाहिस्ता खान यांचा गौरवमय सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात साजरा
शिक्षण क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळीबीड।एस.एम.न्युज़ -"शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असून त्याच्या ज्ञानदानामुळे अनेक पिढ्या घडतात. विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या गुणांमुळे उस्मान खान शाहिस्ता खान यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचे कार्य भावी शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे," अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.
जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, जुना बाजार, बीड येथील कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक उस्मान खान शाहिस्ता खान यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त दि. १ जुलै २०२६ रोजी गॅलेक्सी हॉल, बीड येथे भव्य निरोप व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विस्तार अधिकारी तुकाराम जाधव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र मुख्याध्यापक विजयकुमार गायसमुद्रे, केंद्रप्रमुख श्रीमती माया सोनवणे, शफीक हाश्मी, काझी मखदूम, शेख मुसा, अब्दुल रशीद खान, हकीम मनियार, डॉ. हाश्मी, एजाज बेग, माजी विस्तार अधिकारी गौतम चोपडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख मैनुद्दीन, लाल वायकर सर, गटनेते खुर्शीद आलम तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, जिल्ह्यातील शिक्षक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते उस्मान खान शाहिस्ता खान यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
प्रास्ताविक सय्यद रिजवान यांनी केले. त्यांनी उस्मान खान यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या प्रामाणिक, अभ्यासू, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीकेंद्री कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन काझी मुशाहेद अजिज यांनी केले.
मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी सांगितले की, "उस्मान खान शाहिस्ता खान यांनी आपल्या सेवाकाळात शाळेची गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने परिश्रम घेतले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलाप्रमाणे जपले. त्यांची कार्यपद्धती, सेवाभाव आणि समर्पण सर्वांसाठी आदर्शवत आहे."
केंद्र मुख्याध्यापक विजयकुमार समुद्र यांनी सांगितले की, "उस्मान खान हे शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व होते. त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक मूल्यांचीही जपणूक केली." केंद्रप्रमुख श्रीमती माया सोनवणे यांनी "कर्तव्यनिष्ठा, वेळेचे नियोजन, विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता आणि सहकाऱ्यांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध यामुळे उस्मान खान यांनी सर्वांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे," असे गौरवोद्गार काढले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी उस्मान खान शाहिस्ता खान यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शैक्षणिक नेतृत्व, विद्यार्थ्यांविषयीची तळमळ आणि समाजाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास अपरिहार्य कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने जिल्हा परिषद बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. सोनवणे साहेब यांनी दूरध्वनीद्वारे उस्मान खान शाहिस्ता खान यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवेचे कौतुक करत पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य आणि समाजसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
उत्तरपर मनोगतात उस्मान खान शाहिस्ता खान यांनी आपल्या सेवाप्रवासातील आठवणींना उजाळा देत, "शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. माझ्या यशामागे अधिकारी, सहकारी शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य आहे. सर्वांनी दिलेल्या प्रेम, विश्वास आणि सन्मानामुळेच हा प्रवास यशस्वी झाला. सेवानिवृत्तीनंतरही समाज आणि शिक्षण क्षेत्रासाठी माझे योगदान कायम राहील," अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षणाधिकारी मा. सोनवणे साहेब, सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, नातेवाईक, हितचिंतक तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या संयोजक समितीचे मनःपूर्वक आभार मानले.
शेवटी उपस्थितांनी उस्मान खान शाहिस्ता खान यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, आनंदी व यशस्वी जीवनासाठी प्रार्थना केली. कृतज्ञता, सन्मान, आपुलकी आणि भावनांनी ओथंबलेला हा गौरवमय सेवानिवृत्ती सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा